मुंबई ।महाराष्ट्र सरकारने अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे माजी खाजगी सचिव रामदास गाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मंत्रालयातील लाचखोरीच्या स्टिंग ऑपरेशननंतर त्यांना खाजगी सचिव पदावरून हटवून मूळ विभागात पाठवण्यात आले होते. त्यानंतर शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांप्रकरणी आता त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात सूचना देण्यात आल्याची माहिती आहे. पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी निलंबनाचा आदेश जारी केला. आदेश जारी झाला, त्यावेळी डॉ. गाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून राज्यपालांनी रामदास गाडे यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कथित लाचखोरीच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले आहे. हे प्रकरण फेब्रुवारी २०२४ मध्ये मंत्रालयातील मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात समोर आलेल्या कथित लाचखोरीच्या स्टिंग ऑपरेशनशी संबंधित आहे. या प्रकरणानंतर डॉ. गाडे यांना प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ विभागात परत पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून पदभार सांभाळला.
नेमकं प्रकरण काय?
निर्मल शर्मा या मेडिकल स्टोअर मालकाने केलेल्या तक्रारीनंतर हे प्रकरण समोर आले होते. औषधांसाठी असलेल्या रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएसची पाकिटे ठेवण्यात आल्याचे आढळल्याने त्यांच्या दुकानाचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता.
या निर्णयाविरोधात शर्मांनी ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले होते. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ते मंत्रालयात पोहोचले. शर्मांच्या आरोपानुसार, सुनावणीदरम्यान त्यांना रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसवण्यात आले.
यावेळी राजेंद्र धेरांगे नावाच्या एका कारकुनाने कथितरित्या १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली, असा आरोप आहे. यातील १ लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, तर १० हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा शर्मांचा दावा आहे. त्यानंतर ही रक्कम निम्मी करण्याचीही चर्चा झाल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले होते.शर्मांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २ हजार रुपये ऑनलाइन आणि ५३ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. या संपूर्ण प्रकरणानंतर मंत्रालयातील लाचखोरीचा मुद्दा चर्चेत आला होता. आता या प्रकरणात रामदास गाडे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने प्रशासन आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.















Discussion about this post