राजस्थानमधील पंचायत निवडणुकीच्या निकालांनी राज्याच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळवले होते. मात्र, ग्रामीण भागातील निवडणुकीत काँग्रेसने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसने भाजपपेक्षा अधिक जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या अनेक मोठ्या नेत्यांच्या मतदारसंघातही पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, पंचायत समितीच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 2,990 जागा जिंकल्या, तर भाजपला केवळ 1,795 जागांवर समाधान मानावे लागले. जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेसने 143 जागा जिंकल्या. तर भाजपला 83 जागाच मिळाल्या. या निवडणुकीत हनुमान बेनीवाल यांच्या पार्टीनेही चांगली कामगिरी केली. पक्षाने पंचायत समितीच्या 438 आणि जिल्हा परिषदेच्या चार जागांवर विजय मिळवला. अपक्ष उमेदवारांनीही 516 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे, यापूर्वी झालेल्या 301 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपने 197 ठिकाणी सत्ता मिळवली होती. त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागातील निकालांमध्ये मोठी तफावत दिसून आली आहे.
2020-21 मध्ये झालेल्या पंचायत निवडणुकीत भाजपने काँग्रेसपेक्षा अधिक जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत चित्र पूर्णपणे बदलले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद वाढल्याचे म्हटले जात आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक धक्का मोठ्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात बसला. मंत्री झाबर सिंह खर्रा यांच्या पत्नी शांती देवी आणि मुलगा अजय सिंह यांचा पंचायत समिती निवडणुकीत पराभव झाला. दुसरा मुलगा दुर्गा सिंह यालाही अपक्ष म्हणून निवडणूक लढवून विजय मिळवता आला नाही. मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांच्या झोटवाडा मतदारसंघातही भाजपची कामगिरी खराब राहिली. येथे 15 पैकी भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला.
दुसरीकडे, जयपूरच्या ग्रामीण भागात काँग्रेसने 22 पैकी 14 पंचायत समित्यांवर विजय मिळवला. तर चोमू आणि सांभरमध्ये भाजपने बाजी मारली. सांगानेरमध्ये आरएलपीने विजय मिळवला. या निकालांवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही प्रतिक्रिया दिली. राजस्थानमधील जनतेने भाजप सरकारला योग्य उत्तर दिल्याचे त्यांनी म्हटले. तर भाजप प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांनी जनतेचा निर्णय स्वीकारत पराभवाची कारणे शोधून पक्षात आढावा घेतला जाईल, असे सांगितले. एकूणच, राजस्थान पंचायत निवडणुकीतील काँग्रेसचा विजय भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे. आगामी 2028 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी ग्रामीण भागात काँग्रेसला नवी ताकद मिळाली आहे. तर ग्रामीण मतदारांमधील घटलेली पकड पुन्हा मजबूत करण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.















Discussion about this post