जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता उघडपणे समोर येऊ लागले आहेत. एकीकडे बँकेवर महायुतीचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि मंत्री गिरीश महाजन प्रयत्नशील असताना, दुसरीकडे स्वपक्षीय आणि मित्रपक्षांमधील नेत्यांच्या दाव्यांमुळे जागावाटपाचा पेच निर्माण झाला आहे. विशेषतः मुक्ताईनगरच्या जागेवरून शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू असल्याने महायुतीची डोकेदुखी वाढली आहे.
मुक्ताईनगरच्या जागेवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना पाळधी येथील निवासस्थानी बैठकीसाठी बोलावले आहे. या बैठकीत चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्यात गुलाबराव पाटील यांना यश येणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटील यांची भूमिका अनुकूल झाल्यास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात फोनवरून चर्चा घडवून आणण्याचेही प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मुक्ताईनगर विकास सोसायटी मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू आहे. शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या जागेवर दावा केला असून, भाजपने ही जागा शिवसेनेसाठी सोडावी, अशी त्यांची मागणी आहे. दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यादेखील याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. एकाच व्यक्तीकडे किती पदे असावीत, असा सवाल उपस्थित करत चंद्रकांत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे रक्षा खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे हा वाद केवळ जागावाटपापुरता मर्यादित न राहता महायुतीतील प्रतिष्ठेचा विषय बनला आहे.
प्रतापराव पाटलांच्या माघारीनंतर कार्यकर्त्यांत नाराजी
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत प्रतापराव पाटील यांनी माघार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. याबाबत बोलताना गुलाबराव पाटील यांनी वाटाघाटींमध्ये काही निर्णय मान्य करावे लागतात, असे स्पष्ट केले. प्रतापराव पाटील यांची समजूत काढण्याचा आपण शंभर टक्के प्रयत्न केला असून, योग्य वेळी त्यांना संधी मिळेल, मात्र त्यासाठी काही काळ थांबावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.
पुढील निवडणुकांवर परिणाम होऊ नये, गुलाबरावांचा सल्ला
जिल्हा बँकेची निवडणूक महत्त्वाची असली, तरी तीच एकमेव राजकीय लढाई नाही. आगामी जिल्हा परिषद निवडणुका तसेच केंद्र आणि राज्य सरकारमधील राजकीय समीकरणे लक्षात घेऊन सर्वांनी संयम राखण्याची गरज असल्याचे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले आहे. स्थानिक पातळीवर गावाचा विकास साधण्यासाठी सर्व विचारांच्या लोकांना सोबत घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. मात्र, या प्रक्रियेत शिवसेनेचे जास्तीत जास्त सरपंच निवडून आणण्यावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीतील नेत्यांमध्ये समन्वय साधण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. एका जागेसाठी मित्रपक्षांमध्येच दावे-प्रतिदावे सुरू असल्याने त्याचा परिणाम आगामी राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता आहे. आता पाळधी येथील बैठकीत गुलाबराव पाटील चंद्रकांत पाटील यांची समजूत काढण्यात यशस्वी होतात का आणि रक्षा खडसे यांच्यासोबत तोडगा निघतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.















Discussion about this post