मुंबई : अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सातत्याने प्रश्न उपस्थित करत सरकारवर आणि VSR कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. आता सोशल मीडियावरील नव्या पोस्टमधून त्यांनी सरकारला थेट आव्हान देत आपली नार्को टेस्ट करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, त्यासोबतच संबंधितांचीही नार्को टेस्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये VSR कंपनीला कथितरित्या क्लीनचिट देण्यासाठी घाई सुरू असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, या कंपनीच्या समर्थनार्थ सोशल मीडिया ट्रोलर्सपासून आमदार आणि मंत्र्यांपर्यंत अनेकजण एकाच भूमिकेतून बोलत आहेत. अजित पवार यांना न्याय मिळवून देण्यासाठी एवढीच ताकद वापरली असती तर महाराष्ट्राला अभिमान वाटला असता, असा टोला त्यांनी लगावला.
रोहित पवार यांनी पुढे सरकारी यंत्रणा एका कंपनीच्या समर्थनासाठी वापरली जात असल्याचा आरोप करत VSR कंपनी आणि ‘त्यांचे’ नेमके काय संबंध आहेत, असा सवाल उपस्थित केला. याचबरोबर एका मंत्र्याने आपली नार्को टेस्ट करण्याची मागणी केल्याचा दावा करत त्यांनी त्यावरही प्रत्युत्तर दिले.
‘माझी आजच्या आज नार्को टेस्ट करा’
रोहित पवार यांनी सरकारला थेट आव्हान देताना, वेळ न दवडता आजच्या आज आपली नार्को टेस्ट करावी, असे म्हटले आहे. मात्र, यासोबतच संबंधित व्यक्तीचीही नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी अट त्यांनी ठेवली आहे. त्यामुळे सत्य समोर येईल, असा दावा त्यांनी केला. ‘मी कधीही तयार आहे; पण सत्य समोर येण्याच्या भीतीने ते या अग्निपरीक्षेला तयार होतील का?’ असा सवालही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे.
फडणवीसांवरील आरोपांनंतर राजकीय वातावरण तापले
यापूर्वी रोहित पवार यांनी VSR कंपनीला देवेंद्र फडणवीस वाचवत असल्याचा आरोप केला होता. पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीसांचा एक फोटोही दाखवला होता. या आरोपांनंतर भाजप नेत्यांकडून रोहित पवारांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया उमटल्या.दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणात पक्षाची भूमिका स्पष्ट करताना रोहित पवार यांनी केलेली वक्तव्ये ही त्यांची वैयक्तिक भूमिका असल्याचे म्हटले होते. त्यामुळे अजित पवार विमान अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील आरोप-प्रत्यारोपांना आणखी धार आली आहे.
आता रोहित पवारांच्या नव्या पोस्टमुळे या प्रकरणातील राजकीय वाद पुन्हा चर्चेत आला असून, सरकार आणि सत्ताधारी नेते यावर काय प्रतिक्रिया देतात, याकडे लक्ष लागले आहे.














Discussion about this post