जळगाव : जामनेर तालुक्यातील फत्तेपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ४० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित महिलेच्या ओळखीच्या मित्रासमोरच हा अमानुष अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे तर नराधमांनी या कृत्याचे मोबाईलवर चित्रीकरण करून तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. याप्रकरणी फत्तेपूर पोलिसांनी अत्यंत वेगाने चक्रे फिरवत १५ पैकी तब्बल १४ आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. उर्वरित एका संशयिताचा शोध सुरू आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण पुन्हा चर्चेत आले असून पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जून रोजी देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन परिसरात ही घटना घडली. ४० वर्षीय महिला तिच्या परिचयातील मित्रासोबत असताना काही जण तेथे आले. त्यानंतर दोन संशयितांनी तिच्यावर जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. यावेळी इतर उपस्थित संशयितांनी संपूर्ण घटनेचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणातील एका संशयिताने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर घटनेची गंभीर दखल घेत फत्तेपूर पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७०(१), ७७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ आणि ६७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी १५ पैकी १४ संशयितांना अटक केली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाचा आढावा घेतला असून, फरार संशयिताला अटक करण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. पुढील तपास फत्तेपूर पोलीस करत आहेत.















Discussion about this post