जळगाव : मान्सूनने जिल्ह्यात २३ जून रोजी प्रवेश केला असला, तरी जळगाव शहरात अपेक्षित पावसाने हजेरी लावली नव्हती. अधूनमधून हलक्या सरी वगळता शहरात उकाडा आणि दमट वातावरण कायम होते. अखेर सोमवारी ढगांच्या गडगडाटासह दमदार पावसाने शहराला झोडपून काढले. सुमारे अर्धा तास झालेल्या या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले, तर उकाड्याने त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
शहरात अचानक काळे ढग दाटून आल्याने काही वेळ वातावरणात अंधार पसरला होता. त्यानंतर सुरू झालेल्या पावसामुळे तापमानात घट झाली आणि वातावरणात गारवा निर्माण झाला. अनेक भागांमध्ये नागरिकांनी पावसाचा आनंद घेतला, तर काही ठिकाणी वाहतूकही संथ झाली.
पुढील दोन दिवसांसाठी ‘यलो अलर्ट’
भारतीय हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. यासाठी जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात अधूनमधून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद
जून महिन्याच्या अखेरीपर्यंत जळगाव शहरात साधारण १३० मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र, २९ जूनअखेर केवळ ८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण महिन्यात केवळ चार दिवसच पावसाने हजेरी लावली असून, आतापर्यंत झालेला संपूर्ण पाऊस याच चार दिवसांत कोसळला आहे. त्यामुळे मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात शहरात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतकऱ्यांच्या आशा पावसावर
सोमवारी झालेल्या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, पेरणीनंतर पिकांच्या वाढीसाठी सातत्याने पाऊस होणे आवश्यक असल्याने आता सर्वांचे लक्ष पुढील दोन दिवसांच्या हवामान अंदाजाकडे लागले आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरल्यास जिल्ह्यातील शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या समस्येलाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.















Discussion about this post