नाशिक : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी आणि महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत तब्बल २०४ रिक्त पदांसाठी मेगाभरती केली जाणार आहे. १८ संवर्गातील या पदांवर मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त्या करण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना २५ नोव्हेंबर २०२६ पासून अर्ज करता येणार आहे.
या भरती प्रक्रियेत वैद्यकीय अधिकारी, विविध विषयांचे तज्ज्ञ डॉक्टर, स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक, तंत्रज्ञ आणि संगणक ऑपरेटर यांसह विविध पदांचा समावेश आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
या भरतीमध्ये स्टाफ नर्स पदाच्या ७९, एएनएमच्या ५७, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या १५, मिश्रकाच्या १५ आणि संगणक ऑपरेटरच्या १० जागा आहेत. याशिवाय विविध तज्ज्ञ डॉक्टर आणि तंत्रज्ञांच्या मिळून २८ जागा भरण्यात येणार आहेत.
शल्यचिकित्सक, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, क्ष-किरण तज्ज्ञ, बधिरीकरण तज्ज्ञ, त्वचारोग तज्ज्ञ आणि मानसोपचार तज्ज्ञ या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १ लाख १० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना दरमहा ७५ हजार रुपये मानधन मिळणार आहे. स्टाफ नर्स, एएनएम, मिश्रक आणि संगणक ऑपरेटर पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २३ हजार ४५५ रुपये मानधन दिले जाणार आहे.
५० टक्के गुण आणि ५० टक्के मुलाखत
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या शेवटच्या वर्षातील गुण आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे. अंतिम वर्षाच्या गुणांना ५० टक्के, तर मुलाखतीला ५० टक्के असे एकूण १०० गुणांचे निकष ठेवण्यात आले आहेत.
निवड झालेल्या उमेदवारांची सुरुवातीला ६ महिन्यांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली जाणार आहे.
jahirat PDF
अर्ज कुठे करायचा?
इच्छुक उमेदवारांनी नाशिक महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा. तसेच आवश्यक कागदपत्रांसह सार्वजनिक आरोग्य विभाग, तिसरा मजला, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अर्ज साद करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अर्जाची अंतिम मुदत २ डिसेंबर २०२६ असल्याने इच्छुक उमेदवारांनी मुदतीपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.














Discussion about this post