जळगाव । घरात एकट्या असलेल्या महिलेच्या घरात मोबाइल चार्जिंगच्या बहाण्याने प्रवेश करून तिच्या गळ्यावर धारदार ब्लेडने वार केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील निवृत्तीनगर परिसरात घडली. या हल्ल्यात गायत्री पाटील (३३) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर पसार होण्याच्या तयारीत असलेल्या तरुणाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

निवृत्तीनगरातील स्वामी समर्थ केंद्राजवळील एका दुमजली घराच्या वरच्या मजल्यावर गायत्री पाटील या एकट्याच होत्या. याच परिसरातील सतीश शिंदे हा तरुण मोबाइलची बॅटरी संपल्याचे सांगत त्यांच्या घरात आला. त्याने मोबाइल चार्जिंगला लावल्यानंतर काही वेळ घरातच थांबला.

अचानक घरातून गायत्री यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला. हा आवाज ऐकताच खालच्या मजल्यावर राहणारे राकेश पाटील आणि त्यांची पत्नी तातडीने वर गेले. त्यावेळी घरातील दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. गायत्री या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या, तर सतीश शिंदे हा घरातच असल्याचे दिसून आले.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत सतीश शिंदे याला पकडले. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, गायत्री यांच्या गळ्यावर धारदार सर्जिकल ब्लेडने वार झाल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घरात प्रवेश करण्यामागे तरुणाचा नेमका उद्देश काय होता आणि हल्ल्याचे कारण काय, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. निवृत्तीनगरसारख्या रहिवासी परिसरात घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.













Discussion about this post