जळगाव । जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता उकाडा आणि दमट वातावरणाचा त्रास वाढू लागला आहे. सकाळपासून उन्हाची तीव्रता जाणवत असून, वातावरणातील आर्द्रतेमुळे दुपारच्या वेळी उष्णतेचा चटका अधिक जाणवत आहे. दरम्यान, दिवसभरातील उष्णतेमुळे दुपारनंतर बाष्पयुक्त ढग तयार होऊन सायंकाळच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

गेल्या काही दिवसांत जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी झाल्या. मात्र, पावसापेक्षा दमटपणामुळे निर्माण झालेला उकाडा नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे. १७ सप्टेंबर रोजी जळगावातील हवेतील आर्द्रतेचे प्रमाण तब्बल ७१ टक्के नोंदले गेले. त्यामुळे तापमान फारसे वाढलेले नसतानाही प्रत्यक्ष जाणवणारी उष्णता अधिक असल्याचे चित्र आहे.

वाऱ्याचा वेग मंदावल्याने वातावरणातील बाष्प बाहेर पडण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी घरात पंखा आणि कुलर सुरू असतानाही नागरिकांना घाम आणि उकाड्यापासून दिलासा मिळत नसल्याचे दिसून येत आहे. आगामी काही दिवसांत कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या मुसळधार पावसाची शक्यता कमी झाली असून स्थानिक वातावरणानुसार काही भागांत हलक्या ते मध्यम सरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावकरांना पुढील काही दिवस सकाळी उन्हाचा चटका, दिवसभर दमटपणा आणि सायंकाळी पावसाच्या सरी, अशा बदलत्या वातावरणाचा सामना करावा लागू शकतो.















Discussion about this post