मुंबई । शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे संघटनात्मक बदल पाहायला मिळत असून, पक्षाच्या महिला आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पद आता विदर्भाकडे जाणार आहे. नागपूर विभागातून डॉ. अंजली साळवे यांची महिला प्रदेशाध्यक्षपदी लवकरच निवड होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

रोहिणी खडसेंचा ३ वर्षांचा कार्यकाल पूर्ण

खानदेशमधून रोहिणी खडसे यांनी गेल्या तीन वर्षांत महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून अत्यंत सरस कामगिरी बजावली आहे. त्यांचा तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जात आहे. दरम्यान, रोहिणी खडसे यांना पक्ष आता कोणती नवी जबाबदारी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
डॉ. अंजली साळवे यांची आक्रमक आणि सडेतोड भूमिका
डॉ. अंजली साळवे या पक्षाची भूमिका अत्यंत सडेतोडपणे मांडण्यात नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत. यापूर्वी राज्य महिला आयोगावरील अध्यक्ष व सदस्य नेमणुकीवरून त्यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला होता. महिलांसाठी काम करणाऱ्या आणि कायद्याची जाण असलेल्यांनाच या पदांवर नियुक्त करावे, केवळ राजकीय पुनर्वसनासाठी याचा वापर होऊ नये, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या हस्ते डॉ. साळवे यांना लवकरच नियुक्तीपत्र प्रदान केले जाणार आहे.
लक्ष्मण बांदल यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती
दुसऱ्या एका घडामोडीत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी उद्योजक लक्ष्मण बांदल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. बांदल यांनी यापूर्वी हवेली तालुक्यातील वडाचीवाडीचे सरपंच म्हणून काम पाहिले असून, ते पक्षाचे एक सक्रिय कार्यकर्ते मानले जातात.















Discussion about this post