जळगाव । जळगावकरांच्या सेवेत आणखी नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. जळगाव बस आगाराच्या प्रांगणात सात नव्या ‘राजमाता जिजाऊ’ बसेसचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते पूजन व फीत कापून लोकार्पण करण्यात आले. या नव्या सात बसेसमुळे जळगाव विभागातील ‘राजमाता जिजाऊ’ बसेसची संख्या ६३ वरून आता ७० वर पोहोचली आहे.

मातृशक्तीचा सन्मान: पालकमंत्री गुलाबराव पाटील
यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, “महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत मिळाल्यापासून मायबहिणींचा एसटीवरील विश्वास आणि प्रवास दोन्ही वाढले आहेत. जिजाऊंनी शिवरायांना घडवले आणि शिवरायांनी स्वराज्य घडवले. आजही प्रत्येक घर घडवण्यात आईच्या संस्कारांचा मोठा वाटा असतो. त्यामुळे ‘राजमाता जिजाऊ’ हे केवळ बसचे नाव नसून, घराघरातील मातृशक्तीला दिलेला खरा सन्मान आहे.” राज्यात टप्प्याटप्प्याने सुमारे तीन हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस प्रवासी सेवेत दाखल होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जळगाव विभागात विविध आधुनिक बसेसचा ताफा
जळगाव विभागात यापूर्वी ६३ बसेस कार्यरत होत्या, ज्या आता वाढून ७० झाल्या आहेत. याशिवाय जळगाव आगारात ३० आणि चोपडा आगारात २० अशा एकूण ५० इलेक्ट्रिक बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. जळगाव जिल्ह्याला अधिकाधिक आधुनिक बसेस मिळाव्यात, यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन महत्त्वाचे
नव्या बसेसबरोबरच प्रवाशांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा उंचावला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त करत पालकमंत्री म्हणाले की, “गाड्या आणि सुविधा वाढल्या असल्या तरी स्वच्छता, सुरक्षितता आणि वेळेचे पालन यावर विशेष भर द्यावा लागेल. बस महामंडळाची असली तरी त्यात बसलेला प्रत्येक प्रवासी आपला माणूस आहे, त्याला सुरक्षित आणि वेळेत पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.”
या लोकार्पण सोहळ्यास आमदार सुरेश भोळे, जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे, जळगाव विभागाचे विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, यंत्र अभियंता सचिन पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, विभागीय वाहतूक अधीक्षक मयूर पाटील, कामगार अधिकारी प्रवीण पाटील, सांख्यिकी अधिकारी रवींद्र पवार यांच्यासह एसटी महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले, सूत्रसंचालन प्रसिद्धी सचिव गोपाळ पाटील यांनी मानले, तर आभार आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांनी मानले.















Discussion about this post