चाळीसगाव । शेतात पीक जोमाने उभे राहिले, उत्पादनही अपेक्षेप्रमाणे झाले; मात्र बाजारात योग्य दर मिळाला नाही. त्यामुळे सहा महिन्यांची मेहनत आणि उत्पादन खर्च डोळ्यांसमोर असतानाही शेतकऱ्याला उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली. चाळीसगाव तालुक्यातील तरवाडे पेठ येथील शेतकरी नानासाहेब भाईदास पाटील यांच्यावर ही वेळ आली आहे.

नानासाहेब पाटील यांनी १ एप्रिल रोजी आपल्या शेतात वांग्याची लागवड केली होती. लागवडीपासून पिकाच्या संगोपनापर्यंत त्यांनी मोठी मेहनत घेतली. योग्य नियोजन आणि पिकाची नियमित काळजी घेतल्याने वांग्याचे पीक चांगले बहरले. शेतात मोठ्या प्रमाणात उत्पादन तयार झाले होते. त्यामुळे यंदा या पिकातून चांगले उत्पन्न मिळेल आणि आर्थिक अडचणी काही प्रमाणात दूर होतील, अशी त्यांना अपेक्षा होती.

बाजारभावाने सगळी गणिते बिघडली
पीक हातात येण्याची वेळ आली, मात्र बाजारातील दराने शेतकऱ्याची निराशा केली. वांग्याला मिळणारा भाव इतका कमी होता की, त्यातून उत्पादनासाठी झालेला खर्चही भरून निघत नव्हता. त्यातच पीक काढणी, मजुरी, वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचवण्याचा खर्च वेगळाच होता. उत्पादन विकून फायदा होण्याऐवजी उलट पदरमोड होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पाटील यांच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. अखेर पीक काढून बाजारात नेण्यापेक्षा ते शेतातच नष्ट करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
सहा महिन्यांची मेहनत काही क्षणांत उद्ध्वस्त
नानासाहेब पाटील यांनी आपल्या शेतातील उभ्या वांग्याच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवला. सहा महिन्यांपासून मेहनत घेऊन जोपासलेले हिरवेगार पीक ट्रॅक्टरच्या चाकाखाली नष्ट झाले. चांगले उत्पादन असूनही केवळ बाजारभावामुळे शेतकऱ्याला हा निर्णय घ्यावा लागल्याने परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे.
दुष्काळाच्या संकटात दराचा फटका
एकीकडे पावसाअभावी कोरड्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे शेतीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांचा खर्च वाढत असताना उत्पादित मालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. मेहनत करून उत्पादन घ्यायचे, मात्र बाजारात भाव मिळत नसल्याने तेच पीक नष्ट करायचे, ही परिस्थिती शेतमालाच्या बाजारभावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी ठरली आहे.















Discussion about this post