जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यात अनेक भागांत मुसळधार पावसाने कहर केला असून हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यवतमाळला रेड अलर्ट जारी करण्यात आला असून अमरावती, नाशिक, धुळे, वाशिम, पुणे, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जळगाव जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी
हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला असून अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जामनेर तालुक्यातील वाकी नदी २४ तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. अनेक दिवसांपासून कोरडे असलेले नदीपात्र आता पूर्ण क्षमतेने वाहू लागले आहे.
दरम्यान, हतनूर धरणाचे तब्बल ३६ दरवाजे उघडण्यात आले असून ७८ हजार क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण परिसरातील तसेच तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मनुदेवी धबधबा प्रवाहित; सातपुड्यात मुसळधार पाऊस
सातपुडा पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मनुदेवी धबधबा प्रवाहित झाला आहे. मुक्ताईनगर परिसरातील कुंड धरण भरले असून कुर्हा-काकोडा येथील नदीलाही पूर आला आहे. मुक्ताईनगर, भुसावळ, रावेर आणि यावल तालुक्यांतील अनेक नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.
जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून पूरग्रस्त भागात जाणे तसेच नदी-नाल्यांमध्ये उतरणे टाळण्याचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील इतर भागांतही नाशिकमध्ये गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून धुळे, वाशिम, अमरावती, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे. पुढील २४ तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.














Discussion about this post