नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने (IOB) देशभरातील ७५० शिकाऊ (Apprentice) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन २० जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या भरतीची ऑनलाइन परीक्षा २ ऑगस्ट २०२६ रोजी होणार आहे.
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे, एससी-एसटी उमेदवारांना ५ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना १० वर्षांची सवलत लागू राहील.
शैक्षणिक पात्रतेबाबत बोलायचे झाल्यास, उमेदवाराने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
निवड झाल्यास मिळणार आकर्षक विद्यावेतन
निवड झालेल्या उमेदवारांना प्रशिक्षणादरम्यान मासिक विद्यावेतन दिले जाणार आहे. मेट्रो शहरांमध्ये नियुक्ती झाल्यास ₹१५,५००, शहरी भागात ₹१४,५०० आणि निमशहरी किंवा ग्रामीण भागात ₹१४,००० इतके मासिक विद्यावेतन मिळेल.
अशी असेल परीक्षा
भरती प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार असून त्यामध्ये सामान्य व आर्थिक जागरूकता, सामान्य इंग्रजी, संख्यात्मक क्षमता व तर्कशास्त्र तसेच संगणक ज्ञान या विषयांवरील एकूण १०० प्रश्न विचारले जातील. परीक्षा १०० गुणांची असून तिचा कालावधी ९० मिनिटांचा असेल. ऑनलाइन परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची स्थानिक भाषा चाचणीही घेतली जाईल.
अर्ज शुल्क
एससी / एसटी : ₹२३६
महिला (सर्वसाधारण / OBC / EWS) : ₹६००
सर्वसाधारण / OBC / EWS (पुरुष) : ₹८००
भरतीसंदर्भातील पात्रता, अर्ज प्रक्रिया, विद्यावेतन आणि इतर अटींची सविस्तर माहिती उमेदवारांनी इंडियन ओव्हरसीज बँकेच्या अधिकृत अधिसूचनेतून तपासावी.















Discussion about this post