जळगाव : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे धरणांतील जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून, पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठीही दिलासादायक परिस्थिती निर्माण झाली आहे. ओढे-नाले वाहू लागल्याने मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. मंगरूळनंतर आता अभोडा धरणही शंभर टक्के भरले असून, सुकी धरण ९७ टक्के जलसाठ्यासह पूर्ण क्षमतेच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मात्र, पारोळा तालुक्यातील बोरी आणि अग्नावती धरणांमध्ये अद्यापही पाण्याचा थेंब साठलेला नाही.
यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याने जून महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा अत्यंत चिंताजनक पातळीवर पोहोचला होता. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवड्यात वरुणराजाने जिल्हाभर धुवांधार बॅटिंग केल्यामुळे धरणांमधील चित्रात लक्षणीय बदल झाला आहे. या दमदार पुनरागमनामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मोठी मदत होणार असून, शेतीसाठीच्या सिंचनाचा मार्गही सुकर झाला आहे.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये सध्या असलेला पाणीसाठा खालीलप्रमाणे आहे:
| धरणाचे नाव | पाणीसाठा (टक्के) |
| मंगरूळ | १००% |
| अभोडा | १००% |
| सुकी | ९७.००% |
| मोर | ६१.००% |
| वाघूर | ६०.५६% |
| हतनूर | ५२.००% |
| शेळगाव बॅरेज | ४५.६१% |
| गूळ | ४१.५१% |
| अंजनी | ३०.५७% |
| गिरणा | २७.१६% |
| बहुळा | २४.८१% |
| मन्याड | १६.८४% |
| भोकरबारी | १०.४१% |
| हिवरा | ६.७२% |
| तोंडापूर | १.४४% |
| अग्नावती | ००.००% |
| बोरी | ००.००% |















Discussion about this post