मुंबई । भारतीय रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा देण्याची तयारी करत आहे. या बदलामुळे आता कन्फर्म तिकिटांची प्रवास तारीख ऑनलाइन मोफत बदलता येईल. अशा स्थितीत, प्रवाशांना आता त्यांची तिकिटे रद्द करण्याची आवश्यकता नाही, ज्यामुळे रद्दीकरण शुल्काचा त्रास कमी होईल.
काय होणार बदल?
रेल्वे कन्फर्म तिकिटाच्या पुनर्नियोजन संदर्भात एक मोठा बदल करणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मोठ्या बदलांविषयी माहिती दिली आहे. समजा जर तुमच्याकडे 20 नोव्हेंबर रोजी मुंबईहून पुण्याला जाण्याचे कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुमचा बेत 5 दिवसांनी पुढे ढकलला, तर तुम्हाला 25 नोव्हेंबर साठी नवीन तिकीट काढण्याची गरज पडणार नाही. तुम्ही तुमच्या 20 नोव्हेंबर च्या कन्फर्म रेल्वे तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकाल आणि त्याच तिकिटावर 25 नोव्हेंबर रोजी पुण्याला प्रवास करू शकाल.
सध्याच्या व्यवस्थेनुसार, प्रवासाचा बेत बदलल्यास तुम्हाला तुमचे तिकीट रद्द करावे लागते. त्यानंतर पुढील तारखेसाठी नव्याने तिकीट बुक करावे लागते. यामध्ये तिकीट रद्द करण्याचे पैसे कापले जातात. तसेच, पुढील तारखेला कन्फर्म तिकीट मिळेलच याचीही खात्री नसते. मात्र आता रेल्वेकडून यात बदल करणार असून जानेवारी पासून ऑनलाइन तिकिटाच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.
पण, यामध्ये कन्फर्म तिकिटाऐवजी कन्फर्म तिकीट मिळेलच याची हमी असणार नाही, यात उपलब्धतेनुसार तिकीट मिळेल. तसेच, भाड्यामध्ये काही फरक असल्यास तो प्रवाशाला भरावा लागेल. या बदलामुळे त्या लाखो प्रवाशांना फायदा होणार आहे.















Discussion about this post