देशासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या कमालीचा उकाडा आणि कडक ऊन असतानाच, हवामान विभागाने (IMD) पुढील ४८ तासांसाठी अत्यंत थरारक आणि चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. आगामी दोन दिवसांत देशातील काही राज्यांमध्ये प्रतितास १०० किलोमीटर वेगाने प्रचंड वादळ आणि मुसळधार पावसासह निसर्गाचे रौद्ररूप पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने काही राज्यांमध्ये ‘रेड’ तर काही ठिकाणी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तासांमध्ये निसर्गाचं रौद्र रूप पहायला मिळू शकतं. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगढमध्ये प्रति तास 100 कीमी वेगाने वादळ येण्याची शक्यता आहे. तसेच मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून, गारपीट देखील होऊ शकते. हरियासह उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, बिहार आणि झारखंड या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात काय स्थिती?
दरम्यान राज्यातल्या काही भागांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हयांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर दुसरीकडे अजूनही विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान मान्सूनबाबत देखील आयएमडीकडून मोठी अपडेट देण्यात आली आहे. मान्सून भारताच्या दिशेनं वेगानं पुढे सरकत असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि लक्षद्वीपच्या काही भागांमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे, अनुकूल वातावरणाची निर्मिती झाली आहे, असं आयएमडीने म्हटलं आहे.















Discussion about this post