जळगाव । जळगाव येथील जिल्हा कारागृहातून एक धक्कादायक आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे. कारागृहातील बॅरेकमध्येच जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या खुनी हल्ल्यात एक कैदी गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी जळगाव येथील जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेत राजू नाना काळे (वय २९, रा. वाल्मीक नगर, जळगाव, सध्या मुक्काम बॅरेक क्र. ०८) असे जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. तर श्याम तुकाराम सुर्यवंशी (रा. जैनाबाद, जळगाव) असे संशयित हल्ला करणाऱ्या कैद्याचे नाव आहे.
संशयित आरोपी श्याम सुर्यवंशी याने जुन्या भांडणाचा राग मनात धरला होता. २६ मे रोजी संध्याकाळी त्याने राजू काळे याला बॅरेकमध्ये एकटे गाठले आणि अचानक पूर्ववैमनस्यातून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, श्यामने राजू याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली आणि त्याला जोरात ओढून भिंतीवर लोटून दिले. हा हल्ला इतका भीषण होता की, राजू काळे याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला.
कारागृहातील या राड्यानंतर जेल प्रशासनात एकच खळबळ उडाली. जखमी कैद्याला तातडीने वैद्यकीय उपचार देण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात आरोपी श्याम सुर्यवंशी याच्याविरुद्ध रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय सोनवणे हे करत आहेत. कारागृहासारख्या अत्यंत सुरक्षित ठिकाणी कैद्यांमध्ये अशा प्रकारे हाणामारी झाल्याने जेलमधील अंतर्गत सुरक्षेबाबत आता उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.














Discussion about this post