सरकारी कंपनीत प्रशिक्षणाची संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) कडून अप्रेंटिसशिप भरतीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत आयटीआय, डिप्लोमा आणि ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ही भरती उत्तर प्रदेशातील कोरवा येथील टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये होणार असून, इच्छुक उमेदवारांना १३ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
या भरतीमध्ये इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट, नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट तसेच नॉन-टेक्निकल डिप्लोमा आणि आयटीआय पात्रताधारक उमेदवारांना संधी मिळणार आहे. पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी निश्चित करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदांसाठी संबंधित शाखेतील चार वर्षांची बीई किंवा बीटेक पदवी आवश्यक आहे. यामध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी या शाखांचा समावेश आहे. नॉन-इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पदांसाठी बीसीए, बीएससी, कॉम्प्युटर सायन्स, बीकॉम किंवा बीए यांसारख्या पदवीधारकांना अर्ज करता येईल. डिप्लोमा आणि आयटीआय पदांसाठी संबंधित पात्रता आवश्यक असेल.
कोणाला अर्ज करता येणार नाही?
ज्या उमेदवारांनी यापूर्वी कोणत्याही संस्थेत अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केले आहे, त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही. तसेच, १५ फेब्रुवारी २०२७ पर्यंत पदवी किंवा पदविका पूर्ण करून पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झालेल्या उमेदवारांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. याशिवाय, एक वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक कामाचा अनुभव असलेले तसेच पत्रव्यवहार पद्धतीने पदवी किंवा पदविका पूर्ण केलेले उमेदवारही पात्र नसतील.
वयोमर्यादा आणि सवलत
या भरतीसाठी सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांचे वय १३ नोव्हेंबर २०२६ रोजी जास्तीत जास्त २६ वर्षे असणे आवश्यक आहे. ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे, तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना पाच वर्षांची वयोमर्यादेत सवलत मिळेल. दिव्यांग उमेदवारांना लागू नियमांनुसार सवलत देण्यात येणार आहे.
एक वर्षाचे प्रशिक्षण; विद्यावेतन मिळणार
निवड झालेल्या उमेदवारांना एक वर्षाचे अप्रेंटिसशिप प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षणादरम्यान लागू अप्रेंटिसशिप नियमांनुसार किंवा संबंधित प्रशिक्षण मंडळाने निश्चित केलेल्या सुधारित दरांनुसार मासिक विद्यावेतन मिळेल. मात्र, अधिकृत जाहिरातीत प्रत्येक पदासाठी विद्यावेतनाची निश्चित रक्कम नमूद करण्यात आलेली नाही. हे विद्यावेतन नियमित कर्मचाऱ्यांच्या पगारापेक्षा वेगळे असेल.
गुणवत्तेच्या आधारे निवड
उमेदवारांची निवड त्यांच्या पदवी किंवा पदविका परीक्षेत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे १०० टक्के गुणवत्तेनुसार केली जाणार आहे. अधिसूचनेनुसार स्वतंत्र लेखी परीक्षा किंवा मुलाखतीचा उल्लेख नाही. गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी पूर्ण करून अंतिम निवड केली जाईल.
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम NATS अधिकृत पोर्टल वर जाऊन नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर HAL कोरवा अप्रेंटिसशिपसाठी दिलेला ऑनलाइन अर्ज भरावा. अर्जात नाव, नोंदणी क्रमांक आणि शैक्षणिक पात्रतेसह आवश्यक माहिती नमूद करून संबंधित कागदपत्रे अपलोड करावीत. सर्व माहिती तपासल्यानंतर अर्ज सबमिट करावा.















Discussion about this post