मुंबई : देशाच्या राजकीय वर्तुळात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यात झालेल्या फोनवरील संवादाची जोरदार चर्चा सुरू आहे. पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी ‘तुम्ही काळजी करू नका, सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही फक्त तब्येतीची काळजी घ्या आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा,’ असे मोदी म्हणाल्याची माहिती समोर आली आहे. या संवादामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी माध्यमांशी संवाद साधताना या फोनवरील संभाषणाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत आपुलकीने आणि काळजीने शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी केली. आतापर्यंत तुम्ही देशासाठी मोठे काम केले आहे. सुप्रियाताईही चांगले काम करत आहेत. त्यामुळे आता तुम्ही आराम करा, असे मोदी यांनी पवारांना सांगितल्याचे मणियार यांनी स्पष्ट केले.
‘सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू’
या संवादात मोदी यांनी सुप्रिया सुळे यांचाही उल्लेख केला. ‘तुम्ही आता तब्येतीची काळजी घ्या. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही ठणठणीत राहा,’ अशा शब्दांत मोदी यांनी शरद पवारांना काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचे विठ्ठल मणियार यांनी सांगितले.
दरम्यान, मोदी यांच्या या आपुलकीच्या संवादाला शरद पवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मी माझ्या तब्येतीची काळजी घेत आहे. तुम्ही सर्वजण असल्यामुळे मला काही चिंता नाही. मी प्रकृतीची काळजी घेतो,’ असे पवार यांनी मोदी यांना सांगितल्याची माहिती मणियार यांनी दिली.
मोदी-पवार संवादाचे राजकीय अर्थ काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील या संवादाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. विशेषतः मोदी यांनी सुप्रिया सुळे यांचा केलेला उल्लेख चर्चेचा विषय ठरत आहे. या संवादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आगामी काळात एनडीएसोबत जाणार का, अशा चर्चांनाही सुरुवात झाली आहे. मात्र, केवळ प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी झालेल्या या फोनवरून कोणत्याही राजकीय निर्णयाचा निष्कर्ष काढता येणार नाही. सध्या या संवादामुळे राज्यासह देशाच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.














Discussion about this post