मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या राजकीय घडामोडींची चर्चा सुरू आहे. एकीकडे शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चांना वेग आला असताना, दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे पुन्हा एकत्र येणार का, याबाबतही राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यातच शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची अचानक भेट घेतल्याने या चर्चांना आणखी उधाण आले आहे. अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे राजकीय चर्चांना नवे वळण मिळाले आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न गुलाबराव पाटील यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी ही शक्यता स्पष्टपणे फेटाळून लावली नाही. “मी काही सांगू शकत नाही. शेवटी मी आगगाडीचा डब्बा आहे. आमचे एकनाथ शिंदे इंजिन आहेत आणि इंजिन जिथे असतं तिथे डब्बा असतो. त्यामुळे जिकडे आमचे इंजिन जाईल, तिकडे डब्बा जाईल,” असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे गटाची पुढील राजकीय भूमिका काय असेल, याबाबत चर्चांना सुरुवात झाली आहे.
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरही भाष्य
दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या शरद पवार यांची भेट घेणार असल्याच्या मुद्द्यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. कोण कोणासोबत एकत्र यावे किंवा येऊ नये, हा संबंधितांचा वैयक्तिक विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या आजारपणाच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार त्यांची भेट घेऊ शकतात. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू असतील; मात्र आपण राष्ट्रवादीचे नेते नसल्याने याबाबत आपल्याला अधिक माहिती नसल्याचेही त्यांनी सांगितले.
संजय राऊतांना गुलाबरावांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेसचे २० ते ३० आमदार पक्ष सोडणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला होता. या दाव्यावरही गुलाबराव पाटील यांनी जोरदार टीका केली. संजय राऊत यांनी आजपर्यंत केलेल्या दाव्यांपैकी किती दावे खरे ठरले, याची टक्केवारी काढली तर ती शून्य असेल, असा टोला त्यांनी लगावला.
“संजय राऊत हे प्रत्येक गोष्टीवर भविष्यकारासारखे बोलत असतात. मात्र त्यांची कोणतीही भविष्यवाणी खरी ठरत नाही. ते हवामानाचा चुकीचा अंदाज सांगणारे फेल शास्त्रज्ञ आहेत,” अशा शब्दांत गुलाबराव पाटील यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला.
एकूणच, राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणापासून ते ठाकरे आणि शिंदे यांच्या संभाव्य राजकीय समीकरणांपर्यंत राज्यात चर्चांना उधाण आले आहे. गुलाबराव पाटील यांच्या ‘इंजिन जिकडे जाईल, डब्बा तिकडेच’ या विधानामुळे भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकी कोणती नवी समीकरणे तयार होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post