जळगाव । जळगावच्या सराफा बाजारात आज आजवरची सर्वात मोठी आणि धक्कादायक उलथापालथ पाहायला मिळाली. केंद्र सरकारने मौल्यवान धातूंवर १५ टक्के आयात शुल्क लागू केल्यानंतर सोन्या-चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली असून, ग्राहक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील सराफ बाजारात आज एकाच दिवसात सोन्याच्या दरात तब्बल १२ हजार रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे जीएसटीसह सोन्याचा दर १ लाख ६२ हजार रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, चांदीच्या किंमतीतही मोठी उसळी पाहायला मिळाली असून, चांदी तब्बल ३० हजार रुपयांनी महागली आहे. सध्या जीएसटीसह चांदीचा दर २ लाख ९८ हजार रुपयांपर्यंत गेला आहे.
या अचानक झालेल्या दरवाढीमुळे नेहमी गजबजलेली जळगावची सुवर्णनगरी आज तुलनेने शांत दिसून आली. लग्नसराईचा हंगाम सुरू असतानाच दरवाढ झाल्यामुळे ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.
सराफा व्यावसायिकांच्या मते, जागतिक बाजारातील अस्थिरता आणि केंद्र सरकारच्या आयात शुल्कवाढीमुळे आगामी काळातही सोन्या-चांदीच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचेही लक्ष आता सराफा बाजाराच्या पुढील हालचालींकडे लागले आहे.















Discussion about this post