नाशिक । नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘सिंहस्थ कुंभपर्व’ पुस्तिकेवर मंत्री गिरीश महाजन यांचा ‘पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री’ असा उल्लेख करण्यात आल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अद्याप कायम असतानाच हा उल्लेख करण्यात आल्याने राजकीय चर्चांना आणखी हवा मिळाली आहे.
काही दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण करण्यात आले होते. पुस्तिकेच्या मागील बाजूस पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्री गिरीश महाजन यांचे छायाचित्र देण्यात आले आहे. महाजन यांच्या छायाचित्राखाली ‘पालकमंत्री आणि कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन’ असा उल्लेख करण्यात आला आहे.
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये यापूर्वीही राजकीय चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अधिकृत निर्णयाचा तिढा कायम असताना सरकारी स्वरूपाच्या पुस्तिकेवर महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख झाल्याने या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.
दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला वेग देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १९ ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर जाणार असून, सिंहस्थाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी बैठक होणार आहे.
त्यामुळे पुस्तिकेवरील ‘पालकमंत्री’ या उल्लेखामागे नेमका निर्णय झाला आहे का, की हा केवळ मुद्रणातील उल्लेख आहे, याबाबत आता राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.















Discussion about this post