जळगाव । लग्नघरात आनंदाचे वातावरण असताना रायसिंगे कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. नातेवाइकांच्या मुलाच्या लग्नासाठी बस्ता खरेदी करण्याच्या उद्देशाने जळगावकडे येत असलेल्या कुटुंबाच्या कारला रस्त्यात भीषण अपघात झाला. कारचे अचानक टायर फुटल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार उलटली. या दुर्घटनेत ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.
चोपडा तालुक्यातील अडावद येथील रायसिंगे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी कारने जळगावकडे रवाना झाले होते. लग्नाच्या तयारीसाठी बस्ता घेण्याचे नियोजन करून ते प्रवास करत असतानाच अडावद रोडवरील चेरी फॅक्टरी परिसरात त्यांच्या कारचे पुढील चाक अचानक फुटले. यामुळे कार अनियंत्रित झाली आणि काही क्षणांतच रस्त्यावर पलटी झाली.
अपघाताची तीव्रता इतकी होती की कारमधील प्रवाशांना गंभीर दुखापती झाल्या. या दुर्घटनेत बवनबाई भगवान रायसिंगे (वय ६५) यांचा मृत्यू झाला. कैलास शिवा रायसिंगे, पुंडलिक शिवा रायसिंगे, दिनेश पुंडलिक रायसिंगे, रेखा पुंडलिक रायसिंगे यांच्यासह अन्य दोघांना गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि नातेवाइकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेमुळे रायसिंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, या अपघाताची संबंधित पोलीस ठाण्यात अद्याप अधिकृत नोंद झालेली नसल्याची माहिती आहे.














Discussion about this post