जळगाव : सध्या आखाती देशांमधील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर गॅस पुरवठा विस्कळीत झाला आहे. भारतातही गॅस टंचाई जाणवत असून सामान्यांना एका सिलिंडरसाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. नेमक्या याच टंचाईचा फायदा घेत चोरट्यांनी आपला मोर्चा आता गॅस गोदामांकडे वळवल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. फैजपूर येथील ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर मध्यरात्री दरोडा टाकून चोरट्यांनी १०० भरलेले सिलिंडर चोरून नेले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरुड शिवारात ललित राणे यांचे भारत गॅसचे अधिकृत गोदाम असून त्याची साठवण क्षमता सुमारे १२,००० किलो आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास राणे यांची पत्नी मृणाल तसेच कर्मचारी दामोदर असटकर यांनी गोदाम व्यवस्थित बंद केले होते. त्या वेळी गोदामात १४.२ किलो वजनाचे एकूण २०९ भरलेले सिलिंडर साठवलेले होते.
मात्र चोरट्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने मुख्य गेटचे कुलूप तोडले आणि सुमारे ३ लाख ११ हजार ८०० रुपये किमतीचे १०० सिलिंडर अवघ्या काही तासांत गायब केले. १०० भरलेले सिलिंडर वाहून नेण्यासाठी मोठ्या वाहनाचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. मुख्य रस्त्यालगत हे गोदाम असूनही पोलिसांच्या गस्तीला चकवा देत ही चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
भरवस्तीत व मुख्य रस्त्यालगत असलेल्या गोदामातून इतक्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने पोलिसांच्या गस्तीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज व इतर पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.















Discussion about this post