मुंबई । मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलन राज्यभरात गाजत असताना, राज्य सरकारने मराठा, कुणबी आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थी व तरुणांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची धग सुरू असतानाच प्रशासनाकडून शिक्षण, भत्ता, परदेशी शिष्यवृत्ती आणि रोजगारासंदर्भातील चार महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जारी करण्यात आले आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना तातडीचा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मराठा आरक्षण, कुणबी नोंदी आणि हैदराबाद गॅझेटिअरचा मुद्दा यांसारख्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांवर अद्याप अंतिम तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सरकारच्या या निर्णयांनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय
मराठा विद्यार्थ्यांना OBCप्रमाणे शैक्षणिक सवलती
शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून तंत्रशिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना OBC विद्यार्थ्यांप्रमाणे उपलब्ध असलेल्या शैक्षणिक सवलती आणि सुविधांचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाने संबंधित विभागीय कार्यालये आणि विद्यापीठांना याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शुल्क, शैक्षणिक योजना आणि इतर सुविधांचा लाभ पात्र विद्यार्थ्यांना मिळण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
वसतिगृह निर्वाह भत्त्यासाठी 200 कोटींचा निधी
EBC, EWS आणि SEBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा रखडलेला वसतिगृह निर्वाह भत्ता देण्यासाठी सरकारने 200 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ही प्रलंबित रक्कम वितरित केली जाणार आहे. त्यामुळे वसतिगृहात राहून शिक्षण घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या अडचणीतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

परदेशी शिक्षणासाठी सारथीच्या शिष्यवृत्तीत मोठे बदल
सारथीच्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. परदेशातील विद्यापीठांची शिक्षण फी थेट संबंधित संस्थेला देण्याची तरतूद करण्यात आली असून, शिष्यवृत्तीवरील कमाल आर्थिक मर्यादाही हटवण्यात आली आहे. याशिवाय अतिरिक्त खर्चासाठी दरवर्षी 1,500 अमेरिकन डॉलर, तर ब्रिटनमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 1,100 GBP (Great British Pound) भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यापीठांची निवड आणि गुणवत्तेचे निकष ठरवण्यासाठी QS क्रमवारीवर आधारित पद्धतीचा वापर केला जाणार आहे.
1,440 मराठा-कुणबी तरुणांना मोफत वाहन प्रशिक्षण
सारथी आणि पिंपरी-चिंचवड येथील IDTRS संस्थेच्या माध्यमातून 1,440 मराठा-कुणबी तरुणांना मोफत वाहनचालक आणि वाहक प्रशिक्षण दिले जाणार आहे. LMV आणि HMV वाहनांसह वाहकाचे प्रशिक्षणही या उपक्रमात समाविष्ट आहे. प्रशिक्षणाला 1 ऑक्टोबर 2026 पासून सुरुवात होणार असून, प्रशिक्षण पूर्ण केलेल्या किमान 1,000 लाभार्थ्यांना रोजगार किंवा स्वयंरोजगार मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.














Discussion about this post