मुंबई : राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या हालचालींमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बैठकांचा धडाका लावला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानीही नेत्यांची भेट झाली. अर्थखात्याच्या मागणीसह विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच, राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. मात्र, या संभाव्य फेरबदलाबाबत पक्षाकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची सकाळी नऊ वाजता बैठक झाली. या बैठकीत पक्षाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतली. अर्थखात्याच्या मागणीसाठी ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.
या भेटीमुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये आगामी काळात काही महत्त्वाचे बदल होणार का, याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. त्यातच राष्ट्रवादीच्या पाच मंत्र्यांना बदलले जाण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाची चर्चा?
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांतील प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याचा दावा केला जात असून, या कथित भेटीत दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
जळगावच्या अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत त्यांच्या स्तरावर कोणतीही चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट केले. मंत्रिमंडळातील फेरबदलाचा निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा अधिकार असल्याचे सांगत, पाच मंत्र्यांना बदलण्याबाबतही पक्षात चर्चा झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
छगन भुजबळांकडूनही चर्चांचे खंडन
मंत्री छगन भुजबळ यांनीदेखील दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणासाठी नेत्यांची भेट झाल्याचे वृत्त फेटाळले. त्यामुळे विलीनीकरणाच्या चर्चांना पक्षातील नेत्यांनी तूर्तास पूर्णविराम दिला आहे.
एकीकडे मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठका आणि अर्थखात्याच्या मागणीचा मुद्दा चर्चेत आहे, तर दुसरीकडे पाच मंत्र्यांच्या संभाव्य बदलाबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. मात्र, मंत्रिमंडळात प्रत्यक्ष फेरबदल होणार का आणि झाल्यास कोणत्या मंत्र्यांना संधी मिळणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.














Discussion about this post