नाशिक । जळगावचे तत्कालीन आणि आताचे नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या नाव आणि पदाचा गैरवापर करून एक बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंट तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याच नावाने हे फेक अकाउंट बनवून त्याद्वारे संदेश पाठवले जात असल्याने प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


थायलंडच्या क्रमांकावरून गैरवापर
सायबर भामट्यांनी या बनावट व्हॉट्सॲप बिझनेस अकाउंटसाठी थायलंड देशाच्या कोडचा (+66) आंतरराष्ट्रीय क्रमांक वापरल्याचे तपासात समोर आले आहे. या अकाउंटवर ‘Ayush Prasad’ असे नाव तसेच नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचे अधिकृत छायाचित्र वापरण्यात आले आहे. या प्रोफाइलचा आधार घेऊन अधिकाऱ्यांना आणि नागरिकांना मेसेज पाठवून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या नावाचा आणि फोटोचा वापर करून आर्थिक फसवणूक किंवा माहिती मिळवण्याचा डाव असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असा प्रकार समोर आल्यानंतर सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या बनावट क्रमांकावरून कोणताही संदेश, कॉल किंवा आर्थिक मागणी आल्यास नागरिकांनी आणि शासकीय अधिकाऱ्यांनी त्याला प्रतिसाद देऊ नये, तसेच तात्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.















Discussion about this post