जळगाव । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात ज्येष्ठ मजुराला लुटल्याची घटना समोर आली आहे. सार्वजनिक ठिकाणी असताना अनोळखी व्यक्तीने हाताला धक्का मारून त्यांच्या हातातील तब्बल २१ हजार रुपयांची रोकड जबरदस्तीने हिसकावून घेत पलायन केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहम्मद बाबू खाटीक (६८, रा. आसोदा, ता. जि. जळगाव) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. १७ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेबारा ते दुपारी बारा वाजेच्या सुमारास ते नवीन बसस्थानक परिसरात होते. त्यावेळी त्यांच्याकडे एकूण २१ हजार रुपयांची रोकड होती. यामध्ये ५०० रुपयांच्या ४० नोटा म्हणजेच २० हजार रुपये, तसेच २०० रुपयांच्या पाच नोटा म्हणजे १ हजार रुपये, अशी रोकड होती.

खाटीक हे बसस्थानक परिसरात असताना अंदाजे ५५ ते ६० वर्षे वयोगटातील एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या जवळ आली. त्याने त्यांच्या हाताला धक्का मारत हातातील रोकड जबरदस्तीने हिसकावून घेतली आणि क्षणात तेथून पळ काढला.घटनेनंतर खाटीक यांनी पोलिसांकडे संशयिताचे वर्णन दिले. त्यानुसार संशयित सावळ्या रंगाचा असून त्याने शर्ट-पँट परिधान केले होते. त्याचे अर्धवट टक्कल असून उंची अंदाजे साडेपाच फूट असल्याचे पोलिसांना सांगण्यात आले आहे.
पोलिसांकडून संशयिताचा शोध
या घटनेप्रकरणी खाटीक यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक उल्हास चऱ्हाटे या प्रकरणाचा तपास करीत असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.















Discussion about this post