मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत आज एक अत्यंत भीषण आणि थरारक प्रसंग ओढवला. साताऱ्यातील आपल्या गावी जात असताना उपमुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर कल्याण-मुरबाड परिसरात वादळी वारे आणि मुसळधार पावसात अडकले. काही काळ विमानावरचे नियंत्रण सुटते की काय, अशी भीतीदायक परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वैमानिकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अनर्थ टळला असून हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचे स्वीय सहाय्यक (PA) आणि ओएसडी (OSD) यांच्यासह महालक्ष्मी येथून साताऱ्यातील ‘दरे’ या आपल्या गावी जाण्यासाठी निघाले होते. हेलिकॉप्टरने उड्डाण केल्यानंतर सर्व काही सुरळीत होते, मात्र कल्याण आणि मुरबाड दरम्यानच्या पट्ट्यात पोहोचताच निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळाले. अचानक सुटलेले सोसाट्याचे वादळी वारे आणि पाऊस यामुळे हेलिकॉप्टर हवेत हेलकावे खाऊ लागले.
खराब हवामानामुळे पुढे जाणे अत्यंत जोखमीचे होते. ढगांच्या गडगडाटात आणि वादळात हेलिकॉप्टरचे नियंत्रण राखणे कठीण होत असताना, वैमानिकाने क्षणार्धात निर्णय घेतला. प्रवासाचा मार्ग बदलून हेलिकॉप्टर पुन्हा मुंबईच्या दिशेने वळवण्यात आले. अत्यंत कौशल्याने वैमानिकाने हे विमान जुहू विमानतळावर यशस्वीरीत्या उतरवले. यामुळे मुख्यमंत्री आणि त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
राजकीय वर्तुळात चिंता आणि खळबळ
ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. अनेक कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी धाव घेतली. सध्या उपमुख्यमंत्री आणि त्यांचे सर्व सहकारी पूर्णपणे सुरक्षित असून, खराब हवामानामुळे सातारा दौरा काही काळासाठी लांबणीवर पडल्याचे समजते.














Discussion about this post