मुंबई । प्रसिद्ध आयपीएस (IPS) अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नवा वाद पेटला आहे. ‘हिंदू संमेलन २०२६’ या कार्यक्रमातील त्यांच्या एका भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या भाषणात नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा उल्लेख करत संघाची स्तुती केल्याचे समोर आले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत नांगरे पाटील यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत आणि त्यांच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काँग्रेसने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) अकाउंटवरून पोस्ट करत विश्वास नांगरे पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसने म्हटले आहे की, “एका बाजूला भारतीय संविधानाची शपथ घेऊन, जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी अंगावर घेणार आणि दुसऱ्या बाजूला दिवसाढवळ्या समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जाहीर स्तुती करणार…हे कसले कर्तव्यदक्ष आयपीएस अधिकारी?”
नांगरे पाटील यांना संघाचा इतिहास माहिती नाही का? असेही काँग्रेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. “शासकीय सेवेत असताना अशा प्रकारे एका विशिष्ट विचारसरणीची आणि द्वेष पसरवणाऱ्या संघटनेची चाटूगिरी करणे म्हणजे लोकशाहीचा आणि संविधानाचा अपमान आहे. पोलिसांचे काम समाजात कायदा व्यवस्था राखणे आहे, की अशा विद्वेष पसरवणाऱ्या संघटनांचे गुणगान गाणे? संघाच्या लोकांनी दंगली घडवल्या हा इतिहास यांना माहिती नाही की काय?”, असा सवालही काँग्रेसने पोस्टमधून उपस्थित केला.
संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरले,
राग दरबारी गाण्या संघाच्या दारी हजर झाले!
विश्वास नांगरे पाटील यांची अलिकडेच नागपूर येथे बदली झाली आहे. या बदलीचा संदर्भ जोडत काँग्रेसने त्यांना खोचक टोला लगावला. “आता या महाशयांची बदली नागपूरला झाली आहे. बरं झालं, ज्यांची सेवा करायची आहे, आता थेट त्यांच्याच चरणी जाऊन सेवा करण्याची संधी यांना मिळाली आहे,” अशी खोचक टिप्पणी काँग्रेसने केली.
काँग्रेसने नांगरे पाटील यांना इशारा देताना म्हटले आहे की, “तुम्ही जनतेच्या पैशावर पगार घेणारे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले सरकारी नोकर आहात, देशद्रोही संघाचे स्वयंसेवक नाही. वर्दीचा गैरवापर करून जर राजकीय आणि धार्मिक अजेंडा राबवणार असाल, तर नागपूर आणि महाराष्ट्राची संविधानप्रेमी जनता हे कदापि खपवून घेणार नाही.”















Discussion about this post