मराठी साहित्यविश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक शरणकुमार लिंबाळे यांची निवड करण्यात आली आहे. पुण्यात आज साहित्य महामंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. लवकरच पत्रकार परिषदेत या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी साहित्यविश्वासाठी ऐतिहासिक टप्पा ठरणार आहे. या महत्त्वपूर्ण संमेलनाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आता ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे साहित्य क्षेत्रातून आनंद व्यक्त केला जात आहे.
‘अक्करमाशी’ आत्मकथेमुळे साहित्यविश्वात विशेष ओळख
शरणकुमार लिंबाळे हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून, त्यांनी आतापर्यंत ४० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ज्येष्ठ मराठी साहित्यिक, कादंबरीकार आणि समीक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. दलित साहित्य चळवळीतील महत्त्वाचे लेखक म्हणूनही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मकथेमुळे त्यांना साहित्यविश्वात विशेष ओळख मिळाली. सामाजिक विषमता, जातिव्यवस्था, वंचितांचे प्रश्न आणि सामाजिक वास्तव यांचे प्रभावी चित्रण त्यांनी आपल्या लेखनातून केले आहे. साहित्य क्षेत्रातील त्यांच्या प्रदीर्घ योगदानाची दखल घेत त्यांची शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
२८ ते ३१ जानेवारी २०२७ दरम्यान संमेलन होण्याची शक्यता
शंभरावे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २८ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२७ या कालावधीत आयोजित होण्याची शक्यता आहे. चार दिवस चालणारे हे संमेलन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप) आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले जाणार आहे.
विशेष म्हणजे, पुणे विद्यापीठात प्रथमच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन होणार असल्याची माहिती समोर आली आहे. शंभराव्या संमेलनाच्या अध्यक्षपदी शरणकुमार लिंबाळे यांची निवड झाल्याने या साहित्य सोहळ्याबाबत साहित्यप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.














Discussion about this post