मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांना पुढील वैद्यकीय तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासून त्यांना खोकला, छातीतील संसर्ग आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास जाणवत होता. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर आवश्यक उपचार आणि वैद्यकीय तपासण्या सुरू आहेत.
शरद पवार यांच्यावर काही दिवसांपासून पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना काल सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, पुढील तपासण्यांसाठी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सुप्रिया सुळे यांनी दिली माहिती
शरद पवार यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली होती. “आम्ही बाबांना पुढील तपासण्यांसाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करत आहोत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
खोकला, छातीचा संसर्ग आणि ब्रॉन्कायटिसचा त्रास
शरद पवार यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर प्रतीत समदानी यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती दिली. शरद पवार यांना काही दिवसांपासून खोकला, छातीचा संसर्ग तसेच ब्रॉन्कायटिसचा त्रास होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या पुढील वैद्यकीय तपासण्या करण्यात येत आहेत.
सध्या शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. आवश्यक त्या तपासण्या आणि उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे लक्ष आहे.शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची माहिती समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक आणि त्यांच्या चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.















Discussion about this post