जळगाव | जळगाव शहरासह परिसरातील वाढत्या वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दुचाकी चोरी करणाऱ्या एका ३४ वर्षीय सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली असून, एका अल्पवयीन बालकाकडूनही चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या धडक कारवाईमुळे एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांची उकल झाली असून पोलिसांनी एकूण दोन मोटारसायकली जप्त केल्या आहेत.
पहिली घटना: अजिंठा चौफुलीवरील चोरी
शनिपेठ परिसरातील रहिवासी तरबेज सैय्यद आसिफ यांनी १ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी आपली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्र. एमएच १९ टी ७७७०) अजिंठा चौफुलीजवळील रिलायबल लॉजिंगच्या पार्किंगमध्ये लावली होती. काम आटोपून परत आल्यावर गाडी चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी गुन्हे शोध पथकाला सूचना दिल्या होत्या. पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोध घेऊन ३ नोव्हेंबर रोजी सुलेमान अरमान तडवी (वय ३४, रा. किनगाव, ता. यावल) याला सापळा रचून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने दुचाकी चोरीची कबुली दिली असून, त्याच्याकडून १० हजार रुपये किमतीची स्प्लेंडर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दुसरी घटना: कुसुंबा शिवारातून चोरी गेलेली दुचाकी हस्तगत
दुसऱ्या घटनेत, कुसुंबा (ता. जळगाव) येथील कैलास पाटील यांची हिरो एचएफ डिलक्स (क्र. एमएच १९ डीएस ५१४०) २५ ऑक्टोबर रोजी कुसुंबा शिवारातून लांबवण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तपणे तपास करून याप्रकरणी एका अल्पवयीन बालकाला निष्पन्न केले. त्याच्याकडूनही चोरीची दुचाकी यशस्वीरीत्या हस्तगत करण्यात आली आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली.















Discussion about this post