नंदुरबार । नंदुरबार जिल्ह्यात लवकरच जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून, निवडणुकीआधीच महायुतीतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील तिन्ही घटक पक्षांकडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षच एकमेकांविरोधात उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपकडून सत्ताकाळात केलेल्या विकासकामांच्या जोरावर मतदारांसमोर जाण्याची तयारी केली जात आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून भाजपच्या कामांचा लेखाजोखा मांडण्याची भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा दाखला देत स्वतंत्र राजकीय ताकद दाखवण्याची तयारी केली जात आहे.
त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विरोधकांपेक्षा महायुतीतील मित्रपक्षांचेच आव्हान अधिक असण्याची शक्यता आहे. तिन्ही पक्ष स्वबळाची भाषा करत असतानाच, निवडणुकीनंतर किंगमेकर होण्याचा दावाही प्रत्येक पक्षाकडून केला जात आहे. त्यामुळे अखेर महायुती एकत्रित निवडणूक लढवणार की तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरणार, याकडे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, नंदुरबारच्या ऊसदराचा प्रश्नही चांगलाच पेटला आहे. ऊसाच्या दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून, कारखानदारांसोबत झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. नंदुरबारचे प्रांताधिकारी बंडू कापसे यांच्या उपस्थितीत ऊसदरासंदर्भात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत शेतकऱ्यांकडून ऊसाला प्रति टन ३ हजार ६५० रुपये दर देण्याची मागणी करण्यात आली. मात्र कारखानदारांकडून ३ हजार २५० ते ३ हजार ३०५ रुपये दर देण्याची भूमिका घेण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार दर मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांनी नंदुरबारमधील कारखान्यांना ऊस न देण्याची भूमिका घेतली आहे.
कारखानदारांनी दोन दिवसांत ऊसदरासंदर्भात योग्य निर्णय घेतला नाही, तर गुजरात राज्यात जाऊन ऊस विक्री करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. त्यामुळे एकीकडे जिल्हा परिषद निवडणुकीमुळे नंदुरबारचे राजकारण तापण्याची शक्यता असताना, दुसरीकडे ऊसदराच्या प्रश्नावरून शेतकरी संघटनाही आक्रमक झाल्याने जिल्ह्यातील राजकीय आणि शेतकरी प्रश्नांना चांगलीच धार आली आहे.
आता महायुतीतील संभाव्य बिघाडीचा फायदा नेमका कोणाला होणार आणि ऊसदराच्या प्रश्नावर कारखानदार पुढील दोन दिवसांत काय निर्णय घेतात, याकडे नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post