जळगाव । आगामी दिवाळी, छठ पूजा आणि इतर उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रवाशांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे गाड्यांमध्ये होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने महाराष्ट्रातून उत्तर भारत आणि गुजरातकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी तीन साप्ताहिक उत्सव विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांच्या माध्यमातून एकूण ३८ फेऱ्या उपलब्ध होणार आहेत.

विशेष म्हणजे या गाड्यांना जळगाव आणि भुसावळसह जिल्ह्यातील विविध स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे दिवाळी आणि छठसाठी उत्तर भारतात जाणाऱ्या तसेच गुजरातकडे प्रवास करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

नांदेड–हजरत निजामुद्दीन विशेष गाडी
गाडी क्रमांक ०७६२१ हजूर साहिब नांदेड–हजरत निजामुद्दीन विशेष गाडी १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी सकाळी ८.४५ वाजता नांदेडहून सुटेल. दुसऱ्या दिवशी दुपारी २ वाजता ही गाडी हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. या गाडीच्या ७ फेऱ्या होतील.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६२२ हजरत निजामुद्दीन येथून १८ ऑक्टोबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर रविवारी रात्री ९.४० वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी मध्यरात्री १२.३५ वाजता नांदेडला पोहोचेल. या गाडीच्याही ७ फेऱ्या असतील. या विशेष गाडीला जळगाव आणि भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
जालना–छपरा विशेष गाडीच्या ८ फेऱ्या
उत्तर भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी जालना–छपरा साप्ताहिक उत्सव विशेष महत्त्वाची ठरणार आहे. गाडी क्रमांक ०७६५१ जालना येथून ७, १४, २१ आणि २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता छपरा येथे पोहोचेल.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६५२ छपरा येथून ९, १६, २३ आणि ३० ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता सुटेल. ही गाडी तिसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वाजता जालना येथे पोहोचेल. या मार्गावर एकूण ८ फेऱ्या होणार असून, जळगाव जिल्ह्यात भुसावळ येथे थांबा देण्यात आला आहे.
नांदेड–उधना विशेष गाडीच्या १६ फेऱ्या
महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या हजूर साहिब नांदेड–उधना मार्गावरही उत्सव विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक ०७६०५ नांदेडहून ५ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी रात्री ११.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी २.३० वाजता उधना येथे पोहोचेल. या गाडीच्या ८ फेऱ्या होतील.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक ०७६०६ उधना येथून ६ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबरदरम्यान दर मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७.४० वाजता नांदेडला पोहोचेल.या गाडीला भुसावळ, जळगाव, धरणगाव, अमळनेर आणि नंदुरबार येथे थांबे देण्यात आले आहेत. या मार्गावर दोन्ही दिशेने मिळून एकूण १६ फेऱ्या होणार आहेत.
प्रवाशांनी वेळेत आरक्षण करण्याचे आवाहन
दिवाळी आणि छठ उत्सवाच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी विशेष गाड्यांचे आरक्षण वेळेत करून घेण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तिकीट आरक्षणासाठी प्रवासी ‘रेलवन’ ॲपचा वापर करू शकतात. तसेच विशेष गाड्यांचे विविध स्थानकांवरील आगमन आणि प्रस्थानाची अचूक वेळ जाणून घेण्यासाठी एनटीईएस (NTES) सुविधेचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.















Discussion about this post