भुसावळ । दीपनगर महामार्गावर भरधाव कंटेनरने मोपेडला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. धडकेनंतर मोपेड कंटेनरच्या पुढील चाकात अडकली. तरीही चालकाने कंटेनर न थांबवता तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत मोपेड फरफटत नेली. दीपनगर नजीकच्या ओव्हरब्रिजजवळ हा थरारक अपघात घडला. अपघातानंतर पसार झालेल्या कंटेनर चालकाला पोलिसांनी नशिराबादजवळ नाकाबंदी करून ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, मिर्झा सलीम बेग (६१, मूळ रा. आग्रा, हल्ली मुक्काम भुसावळ) आणि देवेंद्र चौधरी (३६, रा. भुसावळ) हे मोपेडवरून वरणगावच्या दिशेने भुसावळकडे येत होते. यावेळी मागून आलेल्या कंटेनर (क्र. यू.पी. ३२ एक्स.एन. ४४५७) ने त्यांच्या मोपेडला जोरदार धडक दिली.

धडकेची तीव्रता एवढी होती की, मोपेडसह दोघेही कंटेनरच्या पुढील चाकात अडकले. कंटेनर चालकाने वाहन थांबविण्याऐवजी वेग वाढवत ते पुढे नेले. तब्बल अर्धा किलोमीटरपर्यंत मोपेड फरफटत गेल्यानंतर दोघे रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. या भीषण अपघातात मिर्झा सलीम बेग आणि देवेंद्र चौधरी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताचा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी तातडीने भुसावळ बाजारपेठ आणि तालुका पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, कंटेनर चालक नशिराबादच्या दिशेने भरधाव वेगाने पळून जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला.
नशिराबाद पोलिसांना याची माहिती मिळताच टोलनाका परिसरात नाकाबंदी करण्यात आली. त्यावेळी पोलिसांनी कंटेनर अडवून चालक अर्पित सिंग (२६, रा. रायबरेली) याला ताब्यात घेतले.
या अपघातामुळे महामार्गावर काही काळ खळबळ उडाली होती. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.














Discussion about this post