सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशनने (CWC) विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीअंतर्गत असिस्टंट मॅनेजर आणि ज्युनियर एक्झिक्युटिव्ह या पदांच्या एकूण ३२७ जागा भरल्या जाणार आहेत. ऑनलाइन अर्ज प्रक्रिया १७ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू झाली असून, इच्छुक उमेदवारांना १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
कोणत्या पदांसाठी किती जागा?
सीडब्ल्यूसीच्या या भरती मोहिमेत एकूण ३२७ पदांचा समावेश आहे. त्यामध्ये १७१ असिस्टंट मॅनेजर आणि १५६ ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदे आहेत. असिस्टंट मॅनेजर पदांमध्ये जनरल, टेक्निकल, फायनान्स आणि इंजिनिअरिंग या क्षेत्रांतील पदांचा समावेश आहे. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी जनरल आणि टेक्निकल या विभागांत भरती केली जाणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
या भरतीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. असिस्टंट मॅनेजर (जनरल) पदासाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आवश्यक आहे. टेक्निकल आणि इंजिनिअरिंग पदांसाठी संबंधित क्षेत्रातील आवश्यक शैक्षणिक व तांत्रिक पात्रता असणे गरजेचे आहे. ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (जनरल) पदासाठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. प्रत्येक पदासाठीची सविस्तर पात्रता अधिकृत जाहिरातीत तपासणे आवश्यक आहे.
किती मिळणार पगार?
सीडब्ल्यूसीच्या भरतीतील वेतनश्रेणीही लक्षवेधी आहे. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ४० हजार ते १ लाख ४० हजार रुपये, तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी २९ हजार ते ९३ हजार रुपये अशी वेतनश्रेणी नमूद करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित नियमांनुसार इतर भत्ते आणि लाभ मिळू शकतात.
वयोमर्यादा किती?
या भरतीसाठी सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा २८ वर्षे आहे. उमेदवारांच्या वयाची गणना १५ नोव्हेंबर २०२६ या तारखेनुसार केली जाणार आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या नियमानुसार कमाल वयोमर्यादेत सवलत मिळू शकते. प्रवर्गनिहाय सवलतींची माहिती अधिकृत जाहिरातीतून तपासावी.
निवड प्रक्रिया कशी असेल?
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षेच्या माध्यमातून केली जाणार आहे. असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ऑनलाइन परीक्षेनंतर मुलाखत घेतली जाईल. तर ज्युनियर एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ऑनलाइन परीक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदाच्या अभ्यासक्रमानुसार सामान्य ज्ञान, तर्कशक्ती, इंग्रजी आणि इतर निर्धारित विषयांचा अभ्यास करावा.
अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ नोव्हेंबर
या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर २०२६ असून, अर्जाची प्रक्रिया त्याच दिवशी रात्री ११.५९ वाजता बंद होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता वेळेत अर्ज करावा. अर्ज करण्यापूर्वी पदनिहाय पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, अर्ज शुल्क आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती अधिकृत भरती जाहिरातीतून तपासून घ्यावी.















Discussion about this post