मुंबई : नीट पेपरफुटी प्रकरणानंतर देशभर गाजलेल्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. मात्र आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अद्याप मागे घेण्यात आले नसल्याचा आरोप करत कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने केंद्र सरकारला पुन्हा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांवरील गुन्हे तातडीने मागे न घेतल्यास देशभर शांततापूर्ण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा CJP चे नेते अभिजित दिपके यांनी दिला आहे.
अभिजित दिपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध केला. आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर आणि गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी सरकारने दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी केली.
CJP चे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांनीही सरकारवर टीका करत, विद्यार्थ्यांशी केलेल्या कराराची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा देशव्यापी आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना दिलेल्या आश्वासनाच्या विरोधात कारवाई सुरू असून त्यामुळे सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी.
२५ जुलैला सरकारकडे तीन प्रमुख मागण्या
CJP ने २५ जुलै रोजी सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या. त्यामध्ये तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, आंदोलनाशी संबंधित आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ₹१ कोटींची आर्थिक मदत, तसेच आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेणे या मागण्यांचा समावेश होता.
CJP च्या म्हणण्यानुसार, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर उर्वरित मागण्यांबाबत सरकारशी चर्चा झाली होती आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सरकारकडून या इशाऱ्यावर काय भूमिका घेतली जाते आणि विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत काय निर्णय होतो, याकडे आता विद्यार्थी आणि देशभरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post