जळगाव : मोठ्या भावाची पत्नी घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आणि विरोध केल्याने गळा आवळून हत्या करणाऱ्या दिराला जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. प्रवीण छगन बैरागी (२६, रा. कुंझर, ता. चाळीसगाव) असे आरोपीचे नाव आहे. तर गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याप्रकरणी त्याची आई लीलाबाई बैरागी हिला तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली.
मयत महिलेचा पती सीआयएसएफमध्ये कार्यरत असून, त्याची चेन्नई येथे नियुक्ती होती. त्यामुळे महिला सासू आणि दीरासोबत गावी राहत होती. आरोपी प्रवीण हा तिच्यावर वाईट नजर ठेवून शरीरसुखाची मागणी करत असल्याने तिने काही काळ माहेर गाठले होते. मात्र, नातेवाईकांनी मध्यस्थी केल्यानंतर ती पुन्हा सासरी आली.
३ जुलै २०१८ रोजी रात्री प्रवीणने महिलेवर पुन्हा बलात्काराचा प्रयत्न केला. महिलेने त्याला तीव्र विरोध केल्याने आरोपीने तिचा गळा आवळून खून केला. घटनेवेळी महिलेची लहान मुलगी जवळच झोपली होती. ती जागी झाल्याने तिने पाहिलेली घटना न्यायालयीन खटल्यात महत्त्वाचा पुरावा ठरली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान मृतदेहाच्या गळ्यावरून मिळालेले बारीक कण आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली दोरी यांचे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेतील अहवालही महत्त्वाचे ठरले. तपास अधिकारी एपीआय दिलीप शिरसाठ, एपीआय जयपाल हिरे आणि पीएसआय हेमंत शिंदे यांच्या तपासावर आधारित पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले.
जिल्हा सरकारी वकील अॅड. सुरेंद्र काबरा यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. साक्षीदारांचे जबाब, न्यायवैद्यकीय पुरावे आणि तपासातील निष्कर्षांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी आरोपींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली.
प्रवीण बैरागीला विविध कलमांतर्गत शिक्षा
प्रवीण बैरागी याला खून केल्याप्रकरणी भादंवि कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप आणि २० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.
बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार रुपये दंड, तर पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपीची आई लीलाबाई बैरागी हिला पुरावे नष्ट केल्याप्रकरणी तीन वर्षे सक्तमजुरी आणि ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला.
दंडाच्या रकमेतून मुलीला ३५ हजार रुपये
न्यायालयाने दंडाच्या रकमेतून ३५ हजार रुपये मयत महिलेच्या मुलीला देण्याचेही आदेश दिले आहेत. या खटल्यात पोलीस पैरवी अधिकारी अमोल पाटील यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. दीर्घकाळ चाललेल्या या खटल्यात साक्षीदारांचे पुरावे आणि न्यायवैद्यकीय अहवाल निर्णायक ठरल्याने अखेर पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.















Discussion about this post