अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ऋषी शेटे यांच्यावर जमावाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (२७ ऑगस्ट) सायंकाळी घडली. शेटे यांच्या कारची जमावाने तोडफोड केली असून, काही जणांनी त्यांच्या हातावर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे नेवासा परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी ऋषी शेटे यांनी केली होती. त्यानंतर नगरपंचायतीच्या पथकाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरू करण्यात आली. कारवाईदरम्यान काही फेरीवाल्यांनी विरोध करत गोंधळ घातला. याचवेळी शेटे यांची कार कारवाई करणाऱ्या पथकाच्या मागून जात असल्याने काही नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला.
या गैरसमजातून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी ऋषी शेटे यांच्या कारची तोडफोड केली. त्यानंतर शेटे यांच्यावरही हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. जमावातील काही व्यक्तींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या नगरपंचायतीच्या पथकातील अधिकारी तसेच पोलिसांवरही हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच नेवासा पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून जमावाला पांगवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसांनी रात्री सुमारे ९० ते १०० जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
दरम्यान, या घटनेनंतर नेवासा परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि परिसरात शांतता राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.















Discussion about this post