नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी हानी झाली असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. या महापुरामागे नेमके कारण काय, याबाबत सुरुवातीपासूनच विविध तर्क-वितर्क आणि आरोप केले जात होते. मात्र, आता शास्त्रज्ञांच्या प्राथमिक अभ्यासातून या नैसर्गिक आपत्तीमागचे धक्कादायक कारण समोर आले आहे. हिमनदीचा मोठा भाग तुटून कोसळल्याने अचानक नदीचा प्रवाह वाढला आणि त्यातून महापूर आल्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.
सुरुवातीच्या अहवालांमध्ये भूकंपामुळे मोठी दरड कोसळल्याने ही दुर्घटना घडली असावी, असे सांगितले जात होते. मात्र, यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (USGS)च्या विश्लेषणानुसार, ही घटना हिमनदीचा काही भाग कोसळल्यामुळे घडल्याचे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, कोसळलेल्या बर्फाच्या प्रचंड वस्तुमानाचा आघात तब्बल ५.२ तीव्रतेच्या भूकंपाइतका होता.
डंडी विद्यापीठातील ग्लेशियोलॉजिस्ट डॉ. सायमन कुक यांनी बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार, नेपाळमधील लाँगटांग लिरुंग शिखराजवळील हिमनदीचा खालचा भाग तुटून वेगळा झाल्याचे त्यांच्या पथकाला आढळून आले आहे. विशेष म्हणजे ही घटना पूरग्रस्त भागापासून सुमारे १५ किलोमीटर पश्चिमेला घडल्याचे सांगण्यात येत आहे.
शास्त्रज्ञांच्या प्राथमिक निरीक्षणानुसार, हिमनदीचा मोठा भाग वायव्य दिशेला तुटला आणि त्यानंतर पश्चिमेकडील नदीत कोसळला. बर्फाचा हा प्रचंड भाग खडकाळ परिसरात आदळल्यानंतर वितळला. त्यामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह अचानक प्रचंड वाढला आणि काही वेळातच महापुराचे रूप धारण केले. या वेगवान प्रवाहासोबत मोठ्या प्रमाणात गाळ, दगड आणि इतर मलबाही वाहून गेला.
दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठातील पृथ्वी विज्ञान विषयाचे प्राध्यापक माईक सर्ल यांनीही या घटनेबाबत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. त्यांच्या मते, हिमनदी किंवा भूस्खलनापासून महापुरापर्यंतची ही संपूर्ण प्रक्रिया काही तासांपासून अनेक दिवसांपर्यंत सुरू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे नेपाळमध्ये आलेला महापूर अचानक निर्माण झालेला नसून, त्यामागे काही काळापासून सुरू असलेली नैसर्गिक प्रक्रिया असण्याची शक्यता आहे.
या महापुराचे भयावह परिणाम आता समोर येत असून, अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांवरही त्याचा परिणाम झाला आहे. अनेक नागरिक अद्याप बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावरही पुराचे अनेक धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. दरम्यान, या आपत्तीचा परिणाम पुढे भारतातील हिमालयीन भागांवर होण्याची शक्यता असल्याने परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. हिमनद्या वितळणे, भूस्खलन आणि अचानक येणारे पूर यामुळे हिमालयीन भागातील आपत्तीचा धोका पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.














Discussion about this post