नवी दिल्ली । काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या बहुप्रतीक्षित ‘बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव्ह (‘Belonging: A Journey of Love’) या पुस्तकाच्या प्रकाशनावरून सध्या राजकीय आणि प्रकाशन क्षेत्रात चर्चा रंगली आहे. भारतात या पुस्तकाचे प्रकाशन करण्याची तयारी करणाऱ्या पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने प्रकल्पातून माघार घेतल्याची माहिती समोर आली आहे. हस्तलिखितातील एका भागावर संपादकीय बदल तसेच काही मजकूर वगळण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, सोनिया गांधी यांनी या बदलांना स्पष्ट नकार दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
नेमका कोणता मजकूर वादात?
पुस्तकातील एका विशिष्ट भागावर पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आक्षेप घेतल्याचे सांगितले जात आहे. संबंधित भागात काही संपादकीय बदल करावेत तसेच काही अंश वगळावेत, अशी प्रकाशकाची भूमिका होती. मात्र, आपल्या लिखाणात कोणताही बदल करण्यास सोनिया गांधी तयार नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये मतभेद निर्माण झाले. या मतभेदानंतर पेंग्विनने भारतातील आवृत्ती प्रकाशित न करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. मात्र, नेमका कोणता मजकूर हटवण्याची मागणी करण्यात आली होती किंवा पुस्तकाच्या कोणत्या भागावर आक्षेप होता, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
भारतीय प्रकाशकांच्या शर्यतीत पुस्तक
पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने माघार घेतल्यानंतर आता या पुस्तकाच्या भारतीय प्रकाशनाचे हक्क मिळवण्यासाठी इतर प्रकाशक प्रयत्नशील आहेत. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, हार्परकॉलिन्स इंडिया या पुस्तकाच्या प्रकाशन आणि वितरणाचा करार करण्याच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
दरम्यान, भारताबाहेरील बाजारात हे पुस्तक १० नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. अमेरिकेत हे पुस्तक अल्फ्रेड ए. नॉफ या प्रकाशन संस्थेकडून प्रकाशित केले जाणार आहे. नॉफ ही पेंग्विन रँडम हाऊसचीच एक शाखा आहे. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीच्या सुमारे एक लाख प्रती प्रकाशित करण्याची तयारी असल्याचेही सांगण्यात आले आहे.
सोनिया गांधींच्या आयुष्याचा वैयक्तिक प्रवास
‘Belonging: A Journey of Love’ हे सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक वैयक्तिक आणि सविस्तर कथन असल्याचे मानले जात आहे. या पुस्तकात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच गांधी कुटुंबाशी जोडलेला त्यांचा प्रवास आणि भारतातील बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचे प्रतिबिंब पाहायला मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुस्तकात १९६५ मध्ये केंब्रिज येथे राजीव गांधी यांच्याशी झालेली भेट, त्यानंतर नेहरू-गांधी कुटुंबात झालेला प्रवेश आणि कुटुंबासोबतचा पुढील प्रवास यांचा उल्लेख आहे. संजय गांधी यांचे निधन, इंदिरा गांधी यांची हत्या आणि त्यानंतर राजीव गांधी यांच्या हत्येनंतर कुटुंबाने अनुभवलेल्या वैयक्तिक दुःखाचाही पुस्तकात आढावा असल्याचे सांगितले जाते. याशिवाय, २००४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला सत्तेची संधी मिळूनही सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारण्यास नकार का दिला, या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयामागील पार्श्वभूमीवरही पुस्तकात प्रकाश टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
पुस्तकाच्या घोषणेदरम्यान सोनिया गांधी यांनी आपल्या कुटुंबाबाबत मोठ्या प्रमाणात लिखाण झाले असले तरी कुटुंबातील सदस्यांच्या भावना, निर्णय आणि मानवी बाजूचे अचूक चित्रण फार कमी ठिकाणी आढळते, असे म्हटले होते.त्यांच्या मते, ही केवळ एका कुटुंबाची किंवा व्यक्तीची कहाणी नसून, गेल्या सहा दशकांमध्ये भारतात झालेल्या सामाजिक आणि राजकीय बदलांकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही या पुस्तकातून वाचकांना मिळणार आहे.आता भारतातील प्रकाशनाची जबाबदारी कोणता प्रकाशक स्वीकारणार आणि पुस्तकातील ज्या मजकुरावरून वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे, तो अंतिम आवृत्तीत कायम राहणार का, याकडे प्रकाशन क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.















Discussion about this post