बारामती । बारामती तालुक्यात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसचा सुपे घाटात भीषण अपघात झाल्याने खळबळ उडाली आहे. सुमारे ४० विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस घाटातील रस्त्यावरून अचानक उलटली. या दुर्घटनेत चार ते पाच विद्यार्थी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जीवितास धोका निर्माण झाला नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पाटसहून विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती बस

मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस सकाळी सुमारे ७ वाजता पाटस येथून विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. कुसेगाव, पडवी आणि गायकवाड मळा मार्गे बस सुपे घाटातून विद्याप्रतिष्ठानच्या संकुलाकडे जात होती. मात्र सुपे घाटात पोहोचताच बसचा अपघात झाला आणि ती रस्त्यावर उलटली.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवारांकडून जखमींची विचारपूस
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दूरध्वनीवरून संबंधित शाळेचे मुख्याध्यापक तसेच डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांनी जखमी विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार आणि योग्य आरोग्यसेवा मिळावी, यासाठी डॉक्टरांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
रोहित पवारांकडून एसटीच्या कारभारावर प्रश्न
विद्या प्रतिष्ठानच्या विद्यार्थ्यांची ST बस सुपे घाटात कोसळल्याची घटना अत्यंत धक्कादायक आणि एसटी महामंडळाच्या सेवेबाबत चिंता वाटावी अशी आहे. काही विद्यार्थ्यांना लागलेला थोडा-मार वगळता नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणत्याही विद्यार्थ्याच्या जिवीतास धोका झाला नाही, हे सर्वजण… pic.twitter.com/ToX4x8yVrv
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 16, 2026
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटल्याची घटना चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या सेवेबाबत प्रश्न उपस्थित करत अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. गेल्या आठवड्यात स्वारगेटहून बारामतीकडे जाणाऱ्या दोन बस बंद पडल्याचा संदर्भ देत एसटीच्या कारभाराबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांसह एसटीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सुपे घाटातील या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, त्याबाबत अधिक माहिती आणि चौकशीचा अहवाल समोर येणे बाकी आहे.















Discussion about this post