नवी दिल्ली | आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपले इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यात आल्याचा दावा करत मेटा आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी अकाउंट ब्लॉक झाल्याचा स्क्रीनशॉट शेअर केला असून, कोणतेही कारण न सांगता ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
केजरीवाल यांनी पोस्टमध्ये म्हटले की, “माझे इन्स्टाग्राम अकाउंट का बंद केले? याबाबत मला कोणतेही कारण सांगितले गेले नाही. मेटाने पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर इतके झुकू नये. नाहीतर एक दिवस भारतात फक्त त्यांचेच अकाउंट सुरू ठेवण्याची वेळ येईल.”
E20 इंधनाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आंदोलन
अलीकडेच केजरीवाल यांनी E20 इंधन धोरणाविरोधात केंद्र सरकारवर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी फिरोजशाह मार्गावरच हा मोर्चा रोखल्याने आंदोलन पुढे जाऊ शकले नाही.
यावेळी केजरीवाल यांनी सरकारविरोधातील लढा सुरूच राहणार असल्याचे सांगत, “जर हा मुद्दा निकाली निघाला नाही, तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल,” असा इशाराही दिला.
इन्स्टाग्राम अकाउंट ब्लॉक करण्यामागील नेमके कारण मेटाकडून अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. केजरीवाल यांनी दावा केला की, त्यांना पाठविण्यात आलेल्या ई-मेलमध्येही कोणतेही स्पष्ट कारण नमूद करण्यात आलेले नाही. दरम्यान, अकाउंट ब्लॉक झाल्यानंतर केजरीवाल यांनी सोशल मीडियावरून संताप व्यक्त करत सरकारवर निशाणा साधला आहे. मात्र, मेटा किंवा केंद्र सरकारकडून याबाबत अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.















Discussion about this post