पुणे । राज्यात गुन्हेगारी वाढताना दिसत असून अशातच पुण्याच्या राजगड तालुक्यातील कोंढवळे गावात ही अतिशय भयानक आणि नृशंस घटना घडल्याचे उघडकीस आले. ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या मदतीने तरूणीला जमीनीत गाडण्याचा प्रयत्न झाला असून यामुळे एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींविरोधात 307 कलमअंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
पीडित तरूणी कोंढवळे गावातील असून तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप पीडित तरूणी आणि तिच्या आईने केला. न्यायप्रविष्ट असलेल्या जमीनीचा बेकायदेशीररित्या ताबा घेण्यासाठी आलेल्या लोकांना त्या तरूणीने रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने तिच्या अंगावर माती टाकली आणि तिला जमिनीत गाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करण्यात आला आहे.
या धक्कादायक घटनेचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. ते नागरिक पोलिसांसह जमिनीचा ताबा घेण्यासाठी आले असता, तरूणीचा त्यांच्याशी वाद झाला. त्यानंतर पोलिसांसमोरच ही घटना घडली. व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओमध्ये ती तरूणी कंबरेपर्यंत मातीत गाडली गेल्याचेही दिसत आहे. अखेर तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी धाव घेत तिला बाहेर काढले. याप्रकरणानंतर तरूणीने वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये रीतसर तक्रार केली आहे. त्यानंतर राजगड पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसंच, या प्रकरणात 10 ते 12 जणांवर गुन्हा दाखल होऊ शकतो.















Discussion about this post