जळगाव | बालविवाह या कुप्रथेवर प्रभावीपणे आळा घालण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयामार्फत सर्व सुजाण नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आले आहे.बालविवाह प्रतिबंध अधिनियम, 2006 नुसार मुलीचे किमान वय 18 वर्षे व मुलाचे किमान वय 21 वर्षे पूर्ण असणे बंधनकारक आहे. यापेक्षा कमी वयात विवाह किंवा विवाहासंबंधी कोणत्याही विधीचे आयोजन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येते.
ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तसेच ग्राम बाल संरक्षण समिती (VCPC) मध्ये सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, मुख्याध्यापक, गावातील डॉक्टर आदींचा समावेश असून त्यांच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक विवाहात वयाची पडताळणी करण्याचे अधिकार त्यांना देण्यात आले आहेत.जळगाव जिल्ह्यात सन 2025 मध्ये चाइल्ड हेल्पलाइन 1098 च्या माध्यमातून 67 बालविवाह रोखण्यात आले. तसेच जानेवारी 2026 पासून आजपर्यंत 27 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. यापैकी एका प्रकरणात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
बालविवाहाबाबत तक्रार करण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन 1098 हा टोल-फ्री क्रमांक उपलब्ध असून, प्राप्त तक्रारी पूर्णपणे गोपनीय ठेवण्यात येतात. तक्रार करताना अल्पवयीन मुलगा-मुलगी व विवाहाचे नियोजन याबाबतची आवश्यक माहिती दिल्यास तत्काळ कार्यवाही करण्यात येते.
बालविवाह झाल्यास संबंधित नवरदेव, वधूचे पालक तसेच हॉल/मंगल कार्यालय मालक, व्यवस्थापक, बँड-डीजे, आचारी, भटजी, मौलवी, फोटोग्राफर, टेन्ट पुरवठादार आदी सेवा पुरवठादारांवरही सहआरोपी म्हणून कारवाई करण्यात येते.अल्पवयात विवाह झाल्यास मुलीची शारीरिक वाढ अपूर्ण राहते तसेच लवकर गर्भधारणा झाल्यामुळे मातामृत्यू, अपंग बालक जन्मास येणे यांसारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात.
अक्षय तृतीया व इतर शुभ मुहूर्तांच्या काळात बालविवाहाचे प्रमाण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांनी सतर्क राहून आपल्या परिसरात कुठेही अल्पवयीन मुला-मुलींचा विवाह होत असल्यास त्वरित 1098 या क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी केले आहे.















Discussion about this post