बुलढाणा । जमिनीच्या फेरफार प्रकरणाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या सहायक महसूल अधिकाऱ्याला एसीबीने (ACB) रंगेहात पकडले आहे. वाशिम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (१६ एप्रिल) मेहकर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात ही धडक कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कैलास भगवान मुरकुटे हे मेहकर येथे सहायक महसूल अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एका तक्रारदाराच्या नातेवाईकाच्या जमिनीवरील फेरफार रद्द करण्याच्या कामासाठी आणि त्याबाबतच्या आदेशाची प्रत देण्यासाठी मुरकुटे यांनी २० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने वाशिम एसीबीकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
तक्रार प्राप्त होताच एसीबीने सापळा रचला. ठरल्यानुसार, १६ एप्रिल रोजी तक्रारदार लाचेची रक्कम घेऊन मुरकुटे यांच्या कक्षात गेले. मुरकुटे यांनी २० हजार रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्यांना झडप घालून रंगेहात पकडले. या धाडसी कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे, उपविभागीय अधिकारी रवींद्र जोगी यांनी काही दिवसांपूर्वीच एक परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना नागरिकांची अडवणूक न करण्याचे आणि लाच न स्वीकारण्याचे कडक निर्देश दिले होते. मात्र, वरिष्ठांच्या या आदेशाला केराची टोपली दाखवत मुरकुटे यांनी लाच स्वीकारल्याने ही कारवाई विशेष चर्चेत आहे.
आरोपी कैलास मुरकुटे यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने यशस्वी केली.















Discussion about this post