मुंबई । मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कारभारावर आक्षेप नोंदवत कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने २ ऑक्टोबर रोजी मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘जेल भरो आंदोलन’ करण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे, मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क येथे प्रस्तावित आंदोलनाला परवानगी नाकारली आहे.

CJPकडून २ ऑक्टोबर, म्हणजेच गांधी जयंतीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी परवानगी मागण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्याचे तसेच परिसरातील वाहतूक आणि ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करत परवानगी नाकारली. त्याचबरोबर मुंबईतील अन्य ठिकाणी आंदोलनासाठी अर्ज करण्याचा पर्याय पोलिसांनी दिला आहे.

परवानगी नाकारल्यानंतर CJPचा ‘जेल भरो’चा इशारा
मुंबई पोलिसांच्या निर्णयानंतर अभिजीत दिपके यांनी आंदोलनाची भूमिका कायम ठेवली आहे. आंदोलनाला परवानगी न मिळाल्यास २ ऑक्टोबरला मुंबईत ‘जेल भरो आंदोलन’ करण्यात येईल, असे त्यांनी जाहीर केले आहे. CJPने या आंदोलनाला आपल्या मागण्यांसाठी पुढील टप्पा म्हणून मांडले आहे.
CJPकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेसह निवडणूक आयोगाच्या कामकाजावरही आक्षेप घेण्यात आले आहेत. यापूर्वी CJPने २६ सप्टेंबरपर्यंत ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास २ ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, निवडणूक आयोगाने SIRसह महत्त्वाचे निर्णय आयोगातील सर्व आयुक्तांच्या सर्वसंमतीने घेतले जात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे CJPचे आरोप आणि आयोगाची भूमिका यांच्यात मतभेद कायम आहेत.
आता २ ऑक्टोबरला CJP नेमकी कोणती भूमिका घेते आणि मुंबई पोलिसांकडून पर्यायी ठिकाणी आंदोलनाला परवानगी मिळते का, याकडे लक्ष लागले आहे.















Discussion about this post