जळगाव । शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त असतानाच, जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या गेट क्रमांक ३ मधून रिक्षा चोरणाऱ्या कल्पेश ज्ञानेश्वर इंगळे (३२) या अट्टल चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीची चोरीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
याबाबत असे की, १२ एप्रिल रोजी सिव्हिल हॉस्पिटलमधून रिक्षा चोरीला गेल्यावर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रभारी अधिकारी अनिल वाघ यांनी तपासासाठी विशेष पथक तैनात केले होते. पोलिसांनी प्रथम परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासादरम्यान गोपनीय खबऱ्याने माहिती दिली की, रामेश्वर कॉलनीतील कल्पेश इंगळे याच्याकडे एक संशयास्पद रिक्षा असून तो ती विक्री करण्याच्या प्रयत्नात आहे.
पोलिस पथक मेहरुण परिसरात शोध घेत असताना कल्पेश शहराच्या दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. पोलिसांनी वेळ न घालवता पांडे डेअरी जवळील एम.एस.ई.बी. ऑफिससमोर सापळा रचला. संशयास्पद ‘पॅजो’ रिक्षा येताच पोलिसांनी ती अडवली. पोलिसांनी विचारपूस केली असता कल्पेशने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
७५ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी आरोपीकडून चोरीची रिक्षा (किंमत ७५ हजार रुपये) हस्तगत केली आहे. ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि डीवायएसपी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अनिल वाघ, मिलिंद सोनवणे, कमलेश पवार, तुषार पाटील आणि पथकाने केली.















Discussion about this post